अलिबाग | पावसाळ्यातील तीन महिने मच्छिमारांना समुद्रातील खोल मासेमारी करण्यास बंदी घालण्यात येते. शिवाय, यंदा मे महिन्यापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे यावर्षी मच्छिमारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. परिणामी उदरनिर्वाह करण्यासाठी मच्छिमारांना सध्या रापणचा आधार घ्यावा लागत आहे.
सततचा वादळी पाऊस, हवामानात होणारे अचानक बदल आणि एलईडी, पर्सनेट बोटींची अनधिकृत मासेमारी, यामुळे स्थानिक कोळीबांधवांना खोल समुद्रात जाऊनदेखील माशांची टंचाई जाणवू लागली आहे. शिवाय, शासनातर्फे १ मे ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कुटुबांच्या उपजीविकेसाठी कोळीबांधवांना सध्या रापणचा आधार घ्यावा लागत आहे. पहाटे चार ते पाच वाजल्यापासून सुरू झालेले रापण दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहते.
एक जाळी पकडण्यासाठी १५ ते २० तरुण मच्छिमार बांधव लागतात. दुपारपर्यंत रापण करून जे मासे मिळतात ते विकून आपला वाटा घेऊन घरी यायचे, असा दिनक्रम या दोन महिन्यांत सुरू राहतो; मात्र जे शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत ते गवंडी किंवा पेंटींग कामाला लागतात. शासनाने अलीकडेच मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मत्स्य प्रजनन काळात दोन महिने कोळीबांधवांच्या हाताला कोणतेही काम नसते. या कालावधीत कुटुंबाचा खर्च, औषधे यासाठी आर्थिक बेगमी नसते. त्यामुळे या नवीन शासन निर्णयाचा अंशतः लाभ मासेमारी करणार्यांना मिळेल, अशी अपेक्षा मच्छिमारांकडून व्यक्त होत आहे.
कोळीबांधवांचा कष्टाचा खेळ
रापणचे जाळे मोठे असते. ते पाण्यातील मोठा भाग व्यापते. या जाळ्याला दोन्ही बाजूंना ५० ते ६० जाड काथ्यांचा दोरखंड, ५० ते ६० पाटे जोडून, १५ फूट उंची राखली जाते. मधील घोळाच्या भागाला पाटे मजबूत लावले जातात. जाळ्याच्या सुरुवातीला व दोरखंडाच्या शेवटी १५ फूट उंचीचा मजबूत दांडा लावलेला असतो.
रापण ओढणे हे सोपे नसते. त्याला दमदार व भक्कमपणे खेचावे लागते. दोरखंड ओढताना कोळीबांधवांना पाय वाळूत खोलवर रोवून ठेवावे लागते. त्यानंतर जाळे किनारी आल्यावर मासे नसल्यास पुन्हा कष्टाचा खेळ सुरू राहतो.