मंत्री गोगावलेंकडून महाडच्या समस्यांचा आढावा , पावसाळ्यात उदभ् वणार्‍या समस्याचें निवारण करण्याच्या सचूना

11 Jul 2025 18:44:27
 mahad
 
महाड | राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी पावसाळ्यात उद्भवणार्‍या समस्या निवारण करण्यासाठी महाडमधील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करून त्या समस्या निवारण करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला करण्यात आल्या.
 
महाड, पोलादपूरमध्ये वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यासंदर्भात महावितरणच्या अधिकार्‍यांना सूचना करण्यात आल्या. तालुक्यामधील विन्हेरे विभाग आणि खाडीपट्टा विभागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे या दोन्ही विभागांसाठी वेगळे सबस्टेशन उभारण्यास सांगण्यात आले. शिरगाव परिसरात हे सबस्टेशन उभारावे, अशा सूचना करण्यात आल्या. अनेक ठिकाणी लोखंडी खांब जीर्ण झाले आहेत, त्या ठिकाणी नवीन वीज खांब टाकण्यात यावेत, अशाही सूचना करण्यात आल्या. ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये हजर राहत नाहीत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत.
 
त्यामुळे नागरिकांना दाखला व इतर कागदपत्रे घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत, असे निदर्शनात येत असल्याने प्रत्येक ग्रामसेवकाने आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये वेळेवर उपस्थित राहून नागरिकांच्या अडीअडचणी दूर कराव्यात, अशा सूचना गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांना दिल्या गेल्या. तर पावसाळी दिवसांमध्ये तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी आपापल्या सजेवर हजर राहून नागरिकांना वारस नोंद व दाखले लवकरात लवकर कसे देता येतील? याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना करण्यात आल्या.
 
महाड शहरातील भुयारी केबल बदलण्याच्या कामालाही वेग कशा पद्धतीने देण्यात येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता बिक्कड, कार्यकारी अभियंता पाटील, प्रांताधिकारी पोपटराव ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील, महावितरण महाडचे उपकार्यकारी अभियंता संतोष गदारी, पोलादपूरचे कार्यकारी अभियंता चोरमाली, त्याच पद्धतीने सर्व सब स्टेशनचे इंजिनियर्स व इतर अधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी प्रत्येक जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महाड नगरपरिषदेचे नगरसेवक, शिवसेना शेतकरी कामगार सेना जिल्हाप्रमुख विजय सावंत, शिवसेना उपजिल्हा समन्वयक राजेश देशमुख, उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडीक, शिवसेना प्रवक्ता नितीन पावले, महिलाआघाडी उपजिल्हा संघटिका सपना मालुसरे, तालुकाप्रमुख रवींद्र तरडे, महाड शहरप्रमुख चेतन सुर्वे, माजी विरोधी पक्षनेते सुनील अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, निलेश ताठरे, संजय कचरे, मनोज काळीजकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित अधिकार्‍यांना आपापली कामे वेळेत पूर्ण करावीत. नागरिकांना कोणत्याही अडचणी उद्भवणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0