गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा महोत्सव , सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा

11 Jul 2025 13:29:25
 mumbai
 
मुंबई | गणेशोत्सवाला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना गणेशभक्तांसाठ एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
 
देशात आणि जगात गणेशोत्सवाची व्याप्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहील, असेही ते म्हणाले.सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी भाजप आमदार हेमंत रासणे यांनी सभागृहात गणेशोत्सवाचे महत्त्व सांगण्यावर भर दिला. "सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. गणेश मंडळे अनेक सामाजिक कार्य करत असतात. आता या उत्सवावर काही बंधने आली आहेत; पण आता गणेशोत्सव ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’ म्हणून जाहीर करावा, तसेच त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. हेमंत रासने यांच्या या मागणीला मंत्री आशिष शेलार यांनी दुजोरा देत उत्तर दिले. महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा १८९३ रोजी लोकमान्य टिळकांनी सुरू केला.
 
त्यापूर्वी घरोघरी हा उत्सव सुरु होता. महाराष्ट्र राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा आता आपण महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल, हे आजच मी स्षप्टीकरण देतो. देशात आणि जगात गणेशोत्सवाची व्याप्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहील, असेही आशिष शेलार यांनी म्हटले.
विसर्जन परंपरागत पद्धतीनेच
"देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयासमोर गणेशोत्सवाबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. पीओपी मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही,” असे आशिष शेलार यांनी नमूद केले. आशिष शेलार यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
 
"शंभर वर्षांच्या परंपरेला कोणी खंडित केले असेल, तर ते तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केले. लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. गणेशोत्सवावर काही लोकांनी ‘स्पीडब्रेकर’ आणले होते, पण आपल्या सरकारने ते दूर केले आहे.” असे आशिष शेलारांनी म्हटले. सरकारची ही भूमिका गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि भव्य आयोजनाला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे असेही ते यावेळी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरचा देखावा करावा
गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणे ही महायुतीची आणि या शासनाची भूमिका आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांना यानिमित्ताने माझी विनंती आहे की, आपण जे वेगवेगळे देखावे करता, त्यामध्ये आपले सैन्य, सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशांतर्गत विकासाची कामे, आपले महापुरुष अशा सगळ्या गोष्टींच्या विचार करावा. सामाजिक भान, पर्यावरणपूरक आणि उत्साहात साजरा होणारा हा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करताना आम्हाला आनंद होतो आहे, असेही शेलार यांनी निवेदनात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0