माणगावात शौचालयाची प्रतीक्षा संपणार , उभारणीच्या कामासाठी ६४ लाखांचा निधी मंजूर

10 Jul 2025 17:34:37
 mangoan
 
माणगाव | स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये उच्चतम कामगिरी करणार्‍या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र शासनाकडून प्रोत्साहनात्मक निधी दिला जातो. त्या अंतर्गत माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये आकांक्षी शौचालय उभारणीच्या कामासाठी रु. ६४ लाख ८ हजार २९९ इतका निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन शिवसेना प्रवक्ते अ‍ॅड. राजीव साबळे यांच्या हस्ते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, मोर्बा रोड नायासमोर माणगाव येथे उत्साही वातावरणात पार पडला.
 
माणगाव या महत्त्वाच्या मध्यवर्ती शहराच्या ठिकाणी शौचालयाची कोणतीही सोय नव्हती. पुरुषाबरोबरच विशेषता महिलांना या समस्यला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे माणगावचे नव्हे तर ग्रामीण भागातून येणार्‍या नागरिकांकडून ही या ठिकाणी नगरपंचायतीने शौचालय उभारावे अशी मागणी होत होती. या मागणीचा विचार करून नगरपंचायतीने आकांक्षी शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याचे भूमिपूजन पार पडले.
 
त्यामुळे लवकरच नागरिकांची सोय होणार आहे. या सोहळ्यास नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. माणगाव नगरपंचायत ही सातत्याने स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी संस्था असून, या आकांक्षी शौचालय प्रकल्पामुळे नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार शौचालय सुविधा मिळणार आहेत.
 
भूमिपूजन प्रसंगी अ‍ॅड. राजीव साबळे म्हणाले की, स्वच्छता ही केवळ मोहीम नसून नागरिकांचे जीवनमान उंचावणारी जबाबदारी आहे. हा प्रकल्प माणगावच्या शहर विकासात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सांगितले की, सदर काम ठेकेदाराकडून निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध आहेत. हा प्रकल्प केवळ सुविधा नव्हे, तर माणगाव शहराची स्वच्छतेकडे वाटचाल अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
 
 
Powered By Sangraha 9.0