अलिबाग | उमाजी म. केळुसकर | राज्याच्या विधानमंडळात जनतेच्या प्रश्नांवर मंथन व्हायला हवं, पण इथे तर सत्तेच्या खुर्चीवर बसलेले लोकप्रतिनिधी आपल्याच जनतेवर हात उचलण्यात आणि अवमानकारक विधाने करण्यात मश्गूल आहेत. शिंदे सेनेचे, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या रुपाने हा माज पहायला मिळाला. त्यांचा माज इतका वाढला आहे की, त्यांना निकृष्ट अन्न मिळाले म्हणून त्यांनी उपहारगृहाच्या सामान्य कर्मचार्याला अमानुष मारहाण केली, त्यापूर्वी दोन दिवस आधी हिंदी भाषिकांची पाठराखण करत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महापुरुषांबद्दलही बेताल बडबड केली होती.
ही केवळ एक घटना नाही, हा तर संपूर्ण व्यवस्थेतील सडकेपणाचा आरसा आहे. ज्या महाराष्ट्राची जनता वर्षानुवर्षे निकृष्ट रस्त्यांपासून ते भ्रष्टाचाराच्या विळख्यापर्यंत अनेक निकृष्ट गोष्टींना तोंड देत आहे, ती आता या लोकप्रतिनिधींच्या उन्मत्तपणावर कसा बुक्का मारणार? विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास असलेले आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आपल्या रूम नंबर १०७ मधून जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, त्यांना देण्यात आलेले जेवण, विशेषतः डाळ, अत्यंत निकृष्ट दर्जाची होती आणि तिला एक प्रकारचा वास येत होता.
त्यांनी तातडीने बनियान आणि कमरेवर टॉवेल लपेटून उपहारगृहामध्ये जाऊन व्यवस्थापकाला जाब विचारला आणि ही डाळ खाल्ल्यानंतर आपल्या पोटात मळमळू लागल्याचेही सांगितले. यानंतर संताप अनावर होऊन उपहारगृहाच्या एका कर्मचार्याला त्यांनी थेट बुक्क्यांनी मारहाण केली. ही निव्वळ एक घटना नाही, ही तर सत्तेच्या मस्तीत आकंठ बुडालेल्या लोकप्रतिनिधींची आणि त्यामागे लपलेल्या सडक्या व्यवस्थेची लख्ख झलक आहे.
एक आमदार, ज्याला जनतेचा सेवक म्हणवून घ्यायला लाज वाटत नाही, तो एका सामान्य कर्मचार्याला, त्याच्या तुटपुंज्या पगारावर गुजराण करणार्या व्यक्तीला, फक्त जेवण निकृष्ट मिळालं म्हणून कुत्र्यासारखा मारतो? लाज वाटली पाहिजे! खरे तर त्यांनी त्या कर्मचार्याला मारहाण करण्यापेक्षा जरा खोलात शिरून यामागचं कारण काय आणि दोष कोणाचा आहे, हे जाणून घेऊन रितसर योग्य ती कारवाई करायला हवी होती.
आमदार साहेबांचा पारा चढला, कारण त्यांना निकृष्ट जेवण मिळालं. अहो, तुमच्या पोटात गेलेला एक घास जर तुम्हाला इतका असह्य होत असेल, तर वर्षानुवर्षे निकृष्ट दर्जाचे रस्ते, ट्रॅफिकचा नरक, ढेपाळलेली आरोग्य यंत्रणा, कुचकामी शिक्षण व्यवस्था आणि बोकाळलेल्या भ्रष्टाचाराने रोज होरपळणार्या जनतेने कोणाकोणाला बुक्के मारायचे? हा प्रश्न आज प्रत्येक सामान्य माणूस तुमच्या तोंडावर फेकून मारतोय. ज्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या सोडवायच्या असतात, ते स्वतःच्या सोयीसाठी, आपल्या अहंकारासाठी सत्तेचा गैरवापर करतात. तुम्हाला जेवणाचा दर्जा आवडला नाही, तर तक्रार करायची होती, कायदेशीर मार्ग अवलंबायचा होता.
पण थेट हात उचलून तुम्ही कोणता आदर्श घालून दिला? तुमचा हा नंगानाच लोकशाही मूल्यांना सरेआम पायदळी तुडवण्यासारखा आहे, आणि हे जनतेला अजिबात मान्य नाही! "छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का?" असे वादग्रस्त विधान हिंदीची पाठराखण करीत याच आमदार संजय गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. ही केवळ वैयक्तिक टीका नाही, हा तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा, इतिहासाचा आणि छत्रपतींच्या महान वारशाचा अपमान आहे!
ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा आत्मसात करून आपले ज्ञान आणि बुद्धिमत्ता सिद्ध केली, ज्यांच्या शौर्याने आणि दूरदृष्टीने स्वराज्याची पताका अभिमानाने फडकवली, त्यांना मूर्ख म्हणण्याची हिंमत एका लोकप्रतिनिधीमध्ये येतेच कशी? हाच आमदारांचा दुटप्पीपणा आहे! छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या म्हणून मराठी जनतेला प्रश्न विचारता, पण परप्रांतीय बांधवांना तुम्ही हे सांगण्याची हिंमत दाखवत नाही की, "तुम्ही १६ भाषा नाही शिकल्या तरी चालेल, महाराष्ट्र राज्यात तुम्ही मराठी भाषा शिका!" तुम्ही हे सांगण्याची हिंमत नाही दाखवत, कारण सत्तेचे तुम्ही कळसूत्री बाहुले आहात! तुम्हाला परप्रांतीय बांधवांची मते जातील म्हणून भीती वाटते, तुमच्या खुर्चीची चिंता वाटते, महाराष्ट्राच्या संस्कृतीची किंवा मराठी भाषेच्या सन्मानाची नाही.
ही तुमची सत्तेसाठीची लाचारी आणि स्वाभिमानशून्यता स्पष्टपणे दाखवते. मराठीबाबत तुम्ही स्वाभिमानशून्यता दाखवता, पण तुमच्या पोटात गेलेल्या एका घासावरून स्वाभिमान दाखवत जर तुम्ही एवढा राडा करत असाल, त्या उपहारगृहातील कर्मचार्याला मारहाण करत असाल तर विचार करा, त्या ग्रामीण भागातील कुपोषित मुलांचा आणि आता शहरांनाही ग्रासलेल्या कुपोषणग्रस्त कुटुंबांचा, ज्यांना निकृष्ट दर्जाचं रेशन मिळतं. त्यांच्या हक्काचं धान्य चोरलं जातं, आणि जे मिळते तेही खाण्यालायक नसतं.
या सगळ्यासाठी कोणाला मारहाण करायची? आणि हा भ्रष्टाचार! प्रत्येक सरकारी कार्यालयात, प्रत्येक कामासाठी सामान्य माणसाला लाच द्यावी लागते. मागेल त्याला काम नाही, तर देईल दाम त्याचे होईल काम ही तुमची भ्रष्टाचारी व्यवस्था बनली आहे. तुमच्याच पक्षाचे अनेक निकृष्ट लोकप्रतिनिधी, जे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात, त्यांना रोज तोंड देणार्या जनतेने कोणाला मारायचे? जनतेच्या मनात तुमच्या या सडक्या व्यवस्थेबद्दल तीव्र असंतोष खदखदतोय.
हा असंतोष केवळ एका आमदाराच्या हिंसक कृत्याबद्दल नाही, तर तो संपूर्ण राजकीय वर्गाबद्दल आहे, जो सत्तेच्या खुर्चीवर बसून जनतेला वार्यावर सोडतो. जेव्हा तुम्हीच कायदा मोडता, जनतेच्या भावना दुखावता, तेव्हा सामान्य माणसाचा कायद्यावरील आणि लोकप्रतिनिधींवरील विश्वास उडतो. याप्रकरणी केवळ त्या आमदारावर कारवाई करून भागणार नाही. ही तर फक्त एका मोठ्या जखमेची लहानशी ठिणगी आहे. लोकप्रतिनिधींना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदार्यांची जाणीव करून देणं आता अनिवार्य झालं आहे.
केवळ कायद्याच्या धाकाने नाही, तर नैतिकतेच्या आणि लोकशाही मूल्यांच्या आधारावर त्यांनी जनतेची सेवा करावी, हीच जनतेची तुम्हाला सणसणीत चपराक आहे. लोकशाहीत जनतेचे सार्वभौमत्व असते, आणि तुम्ही तिचे केवळ सेवक आहात. जर सेवकांनीच मालकासारखे वागण्यास सुरुवात केली, तर लोकशाहीचा आत्माच मारला जाईल. आता जनतेला जागे होण्याची आणि तुमच्या या मनमानी कारभाराला चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. केवळ सोशल मीडियावर ओरडून उपयोग नाही, तर व्यवस्थेतील या सडकेपणाविरोधात एकत्र येऊन आवाज उठवणे आवश्यक आहे.
ज्या दिवशी जनतेला आपल्या प्रश्नांसाठी कोणाला मारहाण करण्याची गरज वाटणार नाही, ज्या दिवशी तुम्ही स्वतःच तुमच्या चुकांची कबुली द्याल आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न कराल, त्याच दिवशी खर्या अर्थाने सुशासन आले असे म्हणता येईल. तोपर्यंत, आमदार महोदयांच्या या बुक्क्यांनी आणि वाचाळ बडबडीने उभे केलेले प्रश्न आणि जनतेच्या मनात असलेला संताप, याचा तुम्हाला गांभीर्याने विचार करावाच लागेल. अन्यथा, सत्तेच्या लाठीने पोळलेली ही व्यवस्था तुम्हालाच एक दिवस जाळून टाकेल!