आरसीएफला शेकापचा निर्वाणीचा इशारा , आरसीएफ कॉलनीचे गेट सामान्यांसाठी उघडे करा...

आरसीएफ कंपनी प्रशासनाला एक महिन्याचा अल्टीमेटम

By Raigad Times    09-Jun-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये स्थानिकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. आरसीएफ कंपनी प्रशासनाची भेट घेऊन स्थानिकांसाठी मार्ग खुला करण्यात यावा, अशी मागणी केली होती. परंतु आरसीएफ प्रशासनाने कोणतीही भूमिका अद्याप घेतलेली नाही.
 
त्यामुळे आता शेकाप स्टाईलने त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. १ जुलैपर्यंत प्रवेश पूर्ववत सुरू केला नाही, तर भूमिपुत्रांसाठी रस्त्यावर उतरु, असा इशारा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे. शेकाप आरसीएफ गेट संघर्ष समितीची बैठक चेंढरे येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात रविवारी (८ जून) आयोजित करण्यात आली होती.
 
त्यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. यावेळी अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील, चेंढरचे माजी सदस्य दत्ता ढवळे, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, संदीप ढवळे, अ‍ॅड. परेश देशमुख, प्रशांत फुलगांवकर, अवधूत पाटील, ओमकार पाटील, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे आदी मान्यवर, पदाधिकारी तसेच कुरुळ, वेश्वी, चेंढरे येथील शेकापचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होते. आरसीएफ कंपनी प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिकांचा वसाहतीमधील प्रवेश बंद केला.
 
कुरुळ, चेंढरे, वेश्वी येथील नागरिकांसह स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. थळ येथे आरसीएफ कंपनी उभी राहिली. कुरुळ, चेंढरे, वेश्वी येथील शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या, म्हणून आरसीएफ कर्मचारी वसाहत उभी राहिली. मात्र कंपनी प्रशासनाने अनेक कारणे सांगून वसाहतीमधून येण्या-जाण्याचा मार्ग बंद केला, आरसीएफ प्रशासनाची ही भूमिका स्थानिकांसाठी अन्यायकारक आहे. अलिबाग-पेण-रेवदंडा बायपास या ठिकाणी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या मार्गावरून अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनाची भेट घेऊन वसाहतीमधून रस्ता पूर्ववत सुरु करण्याची मागणी करुन प्रशासनाला संधी दिली. मात्र त्यांनी अद्यापही भूमिका घेतली नाही. त्यामुळे आजच्या बैठकीतून एक वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.