उरण | कोकण समुद्र किनारी वसलेल्या उरण, रायगड, मुंबई समुद्र परिसरातील ठिकठिकाणी पावसाळी बंदी काळातही मागील सात दिवसांत अवैधरित्या मासेमारी करणार्या पाच मच्छीमार बोटी ताब्यात घेऊन काही बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
खोल समुद्रातील मासेमारीसाठी बंदीचे आदेश असतानाही आदेशाचे उल्लंघन करून उरण-मुंबई-रायगड समुद्र परिसरातील काही मच्छीमार नौका ठिकठिकाणी अवैधरित्या मासेमारी करीत असल्याचे आढळून आले आहे. बंदी काळात १ ते ७ जूनदरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकार्यांनी अवैधरित्या मासेमारी करणार्या जय गौरी नंदन, एकवीरा माता, श्री जागृत गौराई, भवानी जगदंबा,देवाची आळंदी आदी पाच मच्छिमार बोटी ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई केली आहे.
यापैकी एका बोटीकडून एक लाख ३० हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, किमान सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संयुक्त गस्त घालणार्या कोस्टगार्ड, केंद्रीय सुरक्षा बल, सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणार्या मच्छीमार बोटींची तपासणी करून कठोरपणे कारवाई करण्याची अपेक्षा आहे.