मामाच्या गावी आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू , श्रीवर्धन खानलोशी येथील घटना

09 Jun 2025 17:59:30
 shreewardhan
 
श्रीवर्धन/दिघी | पर्यटनासाठी मामाच्या गावी आलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (७ जून) सायंकाळी श्रीवर्धन तालुक्यातील खानलोशी येथील दगड खाणीतील खोल पाण्यात घडली. तेजस सुनील निगुडकर (वय २४, मूळगाव काळींजे, श्रीवर्धन) सध्या वास्तव्यास दिवा, ठाणे) असे मृत युवकाचे नाव आहे.
 
कातळकर कुटुंबीय दिवा, ठाणे येथून आपल्या मामाच्या गावाला काळींजे (ता. श्रीवर्धन) येथे आले होते. यावेळी तेजस सोबत त्याचे मामे बंधू अशी सहाजण भावंडे सोबत सर्व कुटुंबीय दिवेआगर येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून परतताना म्हसळा मार्गे श्रीवर्धनकडे जात असताना खानलोशी परिसरातील एका जुन्या दगडखाणीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी पाहून त्यांनी पोहण्याचा निर्णय घेतला.
 
पाण्यात उतरलेले तेजस आणि त्याची इतर सहा भावंडे पोहत असताना, तेजस थोडेसे पुढे गेला आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे लक्षात येताच अनुज कातळकर आणि आर्यन कांबळे यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुमारे दहा मिनिटे पाण्यात शोध घेतला, परंतु तेजस सापडला नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आले आणि अखेर तेजसला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तत्काळ त्याला खासगी वाहनाने बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
 
 
Powered By Sangraha 9.0