म्हसळ्यात पाणीपुरवठा योजनेचे पाईप चोरीला! एवढेच बघायचे राहिले होते...

07 Jun 2025 16:52:04
 mhasla
 
म्हसळा | म्हसळा शहरातील पाणी पुरवठा योजनेसाठी आणलेले २३० पाईप चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या जलवाहिन्यांची किंमत २५ लाख आहे. याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हसळा शहरात ४२ कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम सुरु आहे.
 
त्यामुळे मागील काही महिन्यांपासून पाणी योजनेचे काम सुरु आहे. यासाठी लागणारी सर्व यंत्रणा संबंधित ठेकेदाराने म्हसळा बायपासनजीक ठेवली होती. गुरुवारी रात्री सुमारे २५ लाख रुपये किमतीचे २३० पाईप अचानक चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराने म्हसळा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार केली आहे.
 
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांचा मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. दरम्यान, म्हसळा शहरातील पाणी योजनेचे पाईप चोरी झाल्यानंतर, एवढाच दिवस बघायचा राहिला होता, अशी चर्चा यानंतर म्हसळ्यामध्ये सुरु झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0