घरफोडी करुन चोरट्यांचा ११ तोळे दागिन्यांवर डल्ला

05 Jun 2025 15:53:35
 panvel
 
पनवेल | नेवाळी येथील घरात अज्ञात चोरट्याने पाठीमागील दरवाजाची कडी तोडून प्रवेश केला आणि घरातील साडेअकरा तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी केली. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमोद दशरथ खांडेकर हे नेवाळी, पनवेल येथे राहत असून दोन जून रोजी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या घरातील सर्वजण गावातील नातेवाईकांच्या उटण्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
 
त्यांनी दरवाजाला कुलूप लावला होता. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे वडील घरी आले असता त्यांनी मुख्य दरवाजा उघडला असता दरवाजा आतून बंद असल्याचे जाणवले. त्यामुळे ते पाठीमागील दरवाजाकडे गेले असता पाठीमागचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.
 
यावेळी प्रमोद खांदेकर व त्यांची पत्नी मुलासह ते घरी पोहोचले. तेव्हा बेडवर सोन्याचे दागिने ठेवण्यासाठीचे बॉक्स पडलेले होते. चोराने त्यांच्या घरात प्रवेश करून आठ तोळे वजनाची सोन्याची गंठण, सोन्याचा चोकर, चैन, अंगठी, टोंगल, रिंग, कुडी असे साडे अकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
 
 
Powered By Sangraha 9.0