मुंबई | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरु झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागून राहिलेली होती.
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. यासंदर्भातील माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात.
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम ७ मे रोजी देण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागले होते. अकराव्या हप्त्याच्या रकमेसह लाडक्या बहिणींना योजना सुरु झाल्यापासून १६५०० रुपये मिळाले आहेत. काही महिन्यांमध्ये दोन महिन्यांची रक्कम लाडक्या बहिणींना एकत्रितपणे देण्यात आली होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम एकत्रित देण्यात आली होती.