पेण विक्रम मिनीडोअरच्या स्टँडला स्थगिती , संघटनेने लवकरात लवकर निर्णय घ्यावा-मुख्याधिकारी जीवन पाटील

04 Jun 2025 17:15:54
 pen
 
पेण | पेण नगरपालिका प्रशासन व कर्मचारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात व यंत्रसामुग्रीसह विक्रम स्टँडवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र खासदार धैर्यशील पाटील व आमदार रविंद्र पाटील यांच्या मध्यस्तीमुळे पेण विक्रम मिनीडोअरचा स्टॅँड हलविण्यास तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
 
परंतु विक्रम मिनीडोअर संघटनेने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी केले आहे. ३ जून रोजी मुख्यधिकारी जीवन पाटील हे पेण नगरपरिषदेचे कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी पोहचले होते. यावेळी विक्रम चालक मालक संघटनचे पदाधिकारी यांनी आमदार रविंद्र पाटील यांची निवासस्थानी भेट घेऊन ही कारवाई थांबिण्याची विनंती केली.
 
यांनतर आमदार रविंद्र पाटील, यांनी मुख्याधिकारी जीवन पाटील, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर विक्रम संघटनेचे पदाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांची बैठक झाली. यावेळी आंदोलनस्थळी खासदार धैर्यशिल पाटील यांनी भेट देऊन योग्य तो निर्णय झाल्याशिवाय प्रशासन व पोलिसांनी कारवाई करू नये असे आवाहन प्रशासनाला केले.
 
या बैठकीत विक्रम चालक संघटनेने योग्य ती भूमिका घेऊन लवकरात लवकर प्रशासनाला त्यांचे म्हणणे कळवावे, अशी चर्चा होऊन कारवाई तूर्तास स्थगित केल्याचे जीवन पाटील यांनी जाहीर केले. खासदार धैर्यशिल पाटील यांनी विक्रम मिनीडोअर संघटनेच्या पदाधिकार्‍यांना पेण नगरपरिषद प्रशासन हद्दीत कुठे-कुठे गाड्या उभ्या करता येतील? यासंदर्भात चर्चा करावी. मी स्वतः खासदार या भूमिकेतून सर्वो तोपरी आपल्या पाठीशी राहीन असे आश्वासन धैर्यशिल पाटील यांनी दिले.
 
 
Powered By Sangraha 9.0