कोलाड रेल्वे स्थानकाचे करोडो रुपयांचे सुशोभीकरण , ...पण या स्थानकात एक पॅसेंजर गाडीशिवाय दुसरी गाडी नाही

04 Jun 2025 20:36:18
kolad
 
कोलाड | सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रायगड जिल्ह्यातील कोलाड व वीर रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले. त्याचे उदघाटन ६ सप्टेंबर २०२४ रोजी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु याच कोलाड स्थानकात फक्त दादर-रत्नागिरी एकच पॅसेंजर गाडी थांबते, तर दुसरी गाडी दिवा-सावंतवाडी कोरोनाकाळापासून बंद करण्यात आली आहे, ती अद्याप सुरु न झाल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे हाल होताना दिसत आहे.
 
मग हे सुशोभिकरण कोणाच्या कामाचे? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत असून वीर-कोलाड ते पनवेलपर्यंत लोकल सुरु करण्याची मागणी केली जात आहे. कोकणात रेल्वे सुरु करण्यासाठी १९७७ साली मधु दंडवते रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वेचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ई. श्रीधरन यांना कोकण महामंडळाचे अध्यक्ष नेमून त्यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेच्या महामार्गाचे काम सुरु झाले.
 
यानंतर १९८९ ते १९९० मध्ये रेल्वे मंत्री जॉज फर्नाडीस यांनी कोकण रेल्वे प्रकल्पाला चालना दिली. कोकणचा विकास व्हावा यासाठी पिढ्यान पिढ्या कसत असलेल्या जमिनी शेतकर्‍यांनी कोकण रेल्वेसाठी दिल्या. कोकण रेल्वेही सुरु झाली परंतु जेथे कोकण रेल्वे सुरु झाली त्या पहिल्याच स्टेशनला रोरो सेवा सुरु झाली व धनदांडग्यांचा प्रश्न सुटला, परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी एकच गाडी थांबत असल्यामुळे प्रवाशी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 
कोलाड हे व्हाईट वॉटर राप्टिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण असून बाजूला कुंडलिका नदी, हिरवेगार निसर्ग, धबधबे सह्याद्रीची नयनरम्य पोर्शभूमी यासाठी ओळखले जाणारे कोलाड तसेच कोलाड परिसरातील गोवे येथे असणारे गीता द. तटकरे पॉलिटेनिकल असल्यामुळे येथे महाराष्ट्राच्या कान्हाकोपर्‍यातून विद्यार्थी येत असतात याच कॉलेजच्या बाजूने कोकण रेल्वे गेली आहे. परंतु येथे कोणतीही लोकल सेवा सुरु नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
 
कोलाड परिसरात वाड्या वस्त्या धरून ७१ गावांचा समावेश होतो. येथून मुंबई जवळ असल्यामुळे पनवेल कोलाड ते वीरपर्यंत लोकल सेवा सुरु झाली तर उद्योगधंद्याना चालना मिळेलद्र गृहिणी तसेच विद्यार्थी यांना पार्ट टाईम नोकरीही करता येईल. तसेच कोलाडपासून पुणे हे नजिकचे ठिकाण अस-न पुणे मार्गाकडे जाणार्‍या लोकांचाही फायदा होईल. सर्व बाबींचा विचार करता तसेच रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल व तरुणांना रोजगारही मिळेल. यामुळे दिवसातून तीन वेळा पनवेल कोलाड ते वीर पर्यंत लोकल रेल्वे सुरु करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0