नागोठणे येथे विहिरीमध्ये विषारी औषध टाकणारा तरुण अटकेत

30 Jun 2025 17:15:13
 nagothna
 
नागोठणे | नागोठणेजवळील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील वेताळवाडी या आदिवासी वाडीतील सार्वजनिक विहिरीत कीटकनाशक औषध टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका तरुणाला नागोठणे पोलिसांनी अटक केली आहे. नरेश नामदेव शिद असे या तरुणाचे नाव आहे.
 
सुमारे ५० घरांची वस्ती असलेल्या वेताळवाडी येथील या सार्वजनिक विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्यात येतो. शुक्रवारी, २७ जून रोजी वाडीतील महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या असता विहिरीतील पाण्यात पांढर्‍या रंगाचे तवंग आल्यासारखे दिसल्याने त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. पाण्यात कुणीतरी कीटकनाशक विषारी औषध टाकल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लगेचच विहिरीतील हे पाणी पिण्यासाठी बंद करण्यात आले.
 
वेताळवाडीतील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होऊ नयेत, यासाठी ऐनघर ग्रामसेवक गोविंद शिद यांनी तातडीने दररोज पिण्याच्या पाण्याचे ७० जार पाठविण्याची व्यवस्था केली आहे. ऐनघर सरपंच कलावती कोकळे, उपसरपंच भगवान शिद, माजी उपसरपंच मनोहर सुटे व ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला.
 
 
Powered By Sangraha 9.0