राष्ट्रवादीकडून सुधाकर घारे यांच्यावर कर्जत विधानसभेची जबाबदारी

30 Jun 2025 17:42:21
 KHALAPUR
 
खोपोली | खालापूर येथील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांना पक्षात पुन्हा एकदा पावन करुन घेतल्यानंतर, राष्ट्रवादीने त्यांच्यावर कर्जत विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुन्हा जेव्हा या तालुक्यात येईन तेव्हा तुमच्या आनंदाला उधाण आलेले असेल, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी घारे यांना दिले होते.
 
शनिवारी, २८ जून रोजी सुधाकर घारे यांना सुतारवाडीला तात्काळ बोलावण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांच्यावर कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सुधाकर घारेंना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नसल्यामुळे कर्जत-खालापूरातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, महिला, युवक, युवती पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. यानंतर घारे यांनी अपक्ष निवडणूक लढवत कडवी झुंज दिली.
 
मात्र त्यांचा पराभव झाला होता. निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी घारे यांना पुन्हा सक्रिय करुन घेतले. यावेळी झालेल्या संवाद मेळाव्यात कर्जत खालापूरातील कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांचे पुर्नवसन करण्याची मागणी केली होती यानंतर, कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली भावना डोक्यात फिट बसली आहे.
 
पुन्हा जेव्हा या तालुक्यात कार्यक्रमाला येईन, तेव्हा तुमच्या आनंदाला उधाण आलेले असेल, असे संकेत त्यावेळी तटकरे यांनी दिले होते. यानंतर सुधाकर घारे यांची महामंडळावर वर्णी लागणार, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र खालापूरचे विद्यमान तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांचे रिक्त असलेले कर्जत विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपद सुधाकर घारेंना दिल्याने कार्यकर्ते हिरमुसले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0