आई एकविरा देवीला जाणार्‍या भाविकांसाठी आता ड्रेसकोड , अंगप्रदर्शन करणार्‍या कपडे, हाफ पँटवर बंदी

30 Jun 2025 16:52:07
alibag
 
अलिबाग | आगरी कोळी बांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणार्‍या कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंगप्रदर्शन करणार्‍या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. एकविरा आईचे व मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ही बंदी घालण्यात आली असून ‘ड्रेस कोड’संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी ७ जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती कार्ला एकविरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.
 
शुक्रवारी (२७ जून) कार्ला येथे आई एकविरा देवीच्या मंदिरात विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने ड्रेस कोडसंदर्भात ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे. कार्ला येथील एकविरा आई ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून देशभरातील विविध ठिकाणीहून भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात. मात्र, काही भक्त अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.
 
त्यामुळे देवीचे व मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी विश्वस्त मंडळाकडे आल्या. अनेक भक्तांनी सोशल मीडियाद्वारे ड्रेस कोडसंदर्भात मागणी केली केली होती. भक्तांच्या मागणीनुसार विश्वस्त मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.
 
alibag
 
मंदिरातील कर्मचार्‍यांसाठीही सूचना एकविरा देवीच्या मंदिरात दर्शन घेतांना येथील कर्मचारी भक्तांवर आरडाओरड करत करतात, भक्तांशी वाद घालत असल्याच्या तक्रारीदेखील विश्वस्त मंडळाकडे आल्या असल्याने मंदिरातील कर्मचार्‍यांनी देवी भक्तांशी वाद न घालण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना देण्यात आल्या आहेत. तसेच भक्तांनीदेखील देवीचे दर्शन घेतांना मंदिरातील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार बाळ्या मामा यांनी देवी भक्तांना केले आहे.
या कपड्यांना असणार बंदी...
एकविरा आईच्या मंदिरात शॉर्ट, मिनी स्कर्ट, वेस्टर्न कपडे, फाटक्या जीन्स, हाफ पँट व अंगप्रदर्शन करणार्‍या कपड्यांना बंदी घालण्यात आली आहे.
 
महिला व मुलींनी साडी, सलवार कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावेत, ज्याने पूर्ण अंग झाकलेले असावे. तर पुरुषांनी व मुलांनी धोतर, कुर्ता पायजमा, पँट शर्ट, टी शर्ट व इतर पारंपरिक कपडे ज्याने पूर्ण अंग झाकलेले असावे.
 
Powered By Sangraha 9.0