रेवस-रेडी सागरी किनारा महामार्गाच्या कामाला गती द्या

27 Jun 2025 16:02:52
 mumbai
 
मुंबई | कोकणाच्या पर्यटनाला चालना देणार्‍या रेवस ते रेडी किनारा महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही लवकरात लवकर पुर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले आहेत.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक झाली. या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपरमुख्य सचिव मनीषा म्हैसकर, यांच्यासह संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणार्‍या रेवस ते रेडी किनारा महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
 
यावेळी त्यांनी लोणावळा येथील स्कायवॉक आणि टायगर पॉईंट विकास, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच्यासह राज्यातील विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, राज्यातील सर्व शासकीय कार्यालये स्वमालकीच्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
 
 
Powered By Sangraha 9.0