राज्यात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम , २६ जून ते ४ जुलैदरम्यान मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा

27 Jun 2025 19:46:38
 alibag
 
अलिबाग | राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यभरात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम २६ जून ते ४ जुलै २०२५ दरम्यान राबविण्यात येणार असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
ही मोहिम विशेषत अकरावी व बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेणारे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आहे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी अनेक विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येत नाही, ही अडचण लक्षात घेता ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला नाही त्यांनी त्वरित आपल्या मूळ जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करावा.
 
तसेच, ३१ मे पूर्वी अर्ज केलेले परंतु अद्याप जात वैधता प्रमाणपत्र न मिळालेले विद्यार्थी संबंधित पडताळणी समिती कार्यालयात २६ जून ते ४ जुलै या कालावधीत प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे सांगण्यात आले आहे.
प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगड स.नं. ७६/२ ब, प्लॉट नं. ९, १४०२अ, तळमजला, सेंट मेरीज्? कॉन्व्हेंट स्कूल मागे, चेंढरे, अलिबाग - ४०२२०१ वेळ: सकाळी १०.०० ते सायं. ६ वाजेपर्यंत.
Powered By Sangraha 9.0