बंधार्‍यात तोल जाऊन एकजण गेला वाहून

24 Jun 2025 17:48:12
 poladpur
 
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील एका बंधार्‍यात आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा तोल गेल्याने तो वाहून गेला आहे. सोमवारी दुपारपासून तपासकार्य सुरु होते. मात्र, उशीरापर्यंत तपास न लागल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे. जोगेश सुरेन ओरन (वय २१ वर्षे) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
 
पोलादपूर शहराजवळ असलेल्या लोहारे तुर्भे गावाजवळील एका केटी बंधार्‍याजवळ लार्सन अँड टूब्रो कंपनीचे तिघे कामगार सोमवारी दुपारी आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र यापैकी जोगेश याचा तोल जाऊन पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
 
वाहून जाणार्‍या व्यक्तीचा महाड मधील साळुंखे रेस्क्यू टीम, पोलादपूर मधील काळभैरव नाथ रेस्क्यू टीम आणि नरवीर रेस्क्यू टीमकडून शोध घेण्यात आला मात्र अद्यापही या व्यक्तीचा शोध लागलेला नाही. पोलादपूर पोलिस पुढील अधिक तपास करत आहेत. पावसाळा सुरु झाल्यापासून रायगड जिल्ह्यातील यंदाची अशाप्रकारची चौथी दुर्घटना आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0