अलिबागजवळील खांदेरी किल्ल्यावर सापडले शिवकालीन खेळांचे अवशेष

23 Jun 2025 19:29:09
 alibag
 
अलिबाग | अलिबागजवळचा खांदेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी एक आहे. याच खांदेरी किल्ल्यात बैठ्या खेळांच्या शोधमोहिमेत तटबंदीवर विविध ठिकाणी कोरलेले शिवकालीन खेळांचे १२ अवशेष सापडले आहेत. या पटांमध्ये ‘मंकला’ हा खेळ प्रामुख्याने दिसतो.
 
त्याशिवाय, वाघ-बकरी खेळाचेही कोरीव अवशेष सापडले आहेत. इतिहास अभ्यासक पंकज भोसले यांच्या शोध मोहिमेअंतर्गत या खेळांचे अवशेष सापडले आहेत. ‘आर्ट ऑफ प्लेईंग’ आणि ‘आपला कट्टा’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या या शोधमोहिमेत बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले, ममता भोसले, केतकी पाटील, सिद्धेश गुरव आणि अनिकेत पाटील यांनी सहभाग घेतला. शोधमोहिमेत खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीवर एकूण १२ अवशेष सापडले आहेत.
 
या पटांमध्ये "मंकला” हा खेळ प्रामुख्याने पहायला मिळतो. यामध्ये आपल्याला जमिनीवर समांतर रेषेमध्ये समोरासमोर सात किंवा आठ किंवा त्याहूनही अधिक खड्डे पहायला मिळतात. या खेळाला ‘मंकला’ असे म्हणतात. हा खेळ नेमका केव्हापासून अस्तित्वात आहे? याचा अद्याप शोध लागलेला नाही. परंतु भारतातील अनेक लेण्यांमध्ये आपल्याला हा खेळ बघायला मिळतो. महाराष्ट्रातील कार्ले, भाजे, बेडसे, आगाशीव, गडद लेणी ह्या सर्व ठिकाणी हा खेळ कोरलेला आहे.
 
मागची १५ वर्षे पुरातन बैठ्या खेळांच्या संशोधनाचे काम आम्ही करत आहोत. या खेळांचा परिचय पुढच्या पिढीला व्हावा, त्यांचे संवर्धन होणे ही काळजी गरज आहे. कधीकधी प्लास्टरिंगमुळे हे पट झाकले जातात. तसे न झाल्यास, या खेळांची माहिती लोकांना मिळू शकेल, असे इतिहास संशोधक पंकज भोसले म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0