खारघरमध्ये वाईन शॉप चालू देणार नाही , आमदार प्रशांत ठाकूर यांचा इशारा

21 Jun 2025 13:18:31
panvel
 
पनवेल | खारघरमध्ये कुठल्याही परिस्थितीत वाईन शॉप चालू देणार नाही, याविरोधात येत्या अधिवेशनामध्ये आवाज उठविणार अशी ग्वाही पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. खारघरमधील सेक्टर ६ येथील शहा आर्केड सोसायटीची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गोल्डन कॉईन वाईन मार्ट हे दारू विक्रीचे सुरु करण्यात आले आहे. या विरोधात संघर्ष संस्थेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (२० जून) आंदोलन छेडण्यात आले.
 
या आंदोलनात खारघरवासी तसेच सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या आंदोलनामुळे गोल्डन कॉईन वाईन मार्ट तसेच जेजेस रसोई या रेस्ट्रॉरंट अँड बारने बांधलेले अनधिकृत बांधकाम पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पाडण्यात आले. खारघर हा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिकदृष्ट्या विकसित होत असलेला परिसर आहे. येथील नागरिकांनी अनेक वेळा खारघरला दारूमुक्त झोन घोषित करण्याची मागणी केली आहे.
 
रहिवासी आणि सामाजिक संस्थांचा विरोध असतानाही वाईन शॉप सुरू केले आहे. खारघर संघर्ष समिती, लोकप्रतिनिधी आणि रहिवासी संघटनांकडून शासन दरबारी सातत्याने दारूबंदी बाबत पाठपुरावा सुरू आहे. १४ जूनला शहा आर्केडमध्ये वाईन शॉप सुरू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
त्यामुळे नागरिकांनी तीव्र निषेध करत, वाईन शॉप त्वरित बंद करण्यात यावे आणि खारघरला कायमचा दारूमुक्त झोन घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. खारघर शहराची नोंद नो लिकर झोन अशी अनेक वर्षांपासून आहे. मात्र असे असतानाही खारघरमध्ये वाईन शॉप सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी संघर्ष संस्थेच्या माध्यामतून खारघरमध्ये दारुबंदीसाठी सर्वपक्षीय आंदोलन काढण्यात आले.
 
 
Powered By Sangraha 9.0