महाड | रायगडात तटकरे आणि गोगावले यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या काखेत रुमाल घेण्याच्या कृतीवरुन नक्कल केली होती. तटकरेंच्या या नकलेला गोगावले यांनी हलक्यात घेतले होते. मात्र रविवारी (१ जून) त्यांच्या वाढदिवशी गोगावले समर्थकांनी तटकरेंची जोरदार खिल्ली उडवली. यावेळी ‘रुमालाची भीती, तटकरे साहेब तुम्हाला किती?’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या.
महाड येथे शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या ‘नॅपकीन स्टाईल’वरुन त्यांना डिवचले होते. तटकरे यांची ही कृती गोगावले यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली होती. स्वतः गोगावले ह्यांनी प्रतिक्रीया दिली; पण ती अगदीच नाममात्र होती. रविवारी, १ जून रोजी मंत्री भरत गोगावले यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने महाड येथे अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गोगावले यांच्या समर्थकांनी वेगळीच तयारी करुन ठेवली होती. या कार्यक्रमात आलेल्या सर्वांना नॅपकीनचे वाटप करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी मंत्री गोगावले यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील नॅपकीन हवेत उडवले आणि तटकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. मंत्री गोगावले नेहमी हातात पांढर्या नॅपकीनचा वापर करतात, समर्थकांनी त्याच रंगाच्या नॅपकीनचे वाटप करत, खासदार तटकरेंना डिवचले आहे. गोगावले यांच्या समर्थकांच्या या कृतीवरुन शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यात महायुतीमध्ये असूनदेखील वाद आहे. अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद जाहीर झाले होते. परंतु मंत्री गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली असून, हा तिढा कायम आहे. यावरुन अनेकदा तटकरे अन् गोगावले यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
रविवारीही शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भाष्य केले. पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार आहे, अशी चर्चा आहे. पण मला याबाबत माहिती नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय जेव्हा होईल, तेव्हा तो आम्हाला मान्य असेल, असेही मंत्री गोगावले यांनी म्हटले. मंत्री भरत गोगावले रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाबाबत प्रचंड आक्रमक आहेत. परंतु त्यांची अलिकडच्या काळातील भूमिका पाहिल्यास ते काहीसे शांत झाल्याचे दिसतात.