देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट, ताम्हाणी घाटात पर्यटनास निर्बंध

19 Jun 2025 17:49:44
 alibag
 
अलिबाग | माणगाव तालुक्यातील भिरा गावाजवळील ‘देवकुंड धबधबा’ सणसवाडी येथील ‘सिक्रेट पॉईंट’ व ‘ताम्हिणी घाट’ व आजूबाजूच्या १ किलोमीटर परिसरात नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही बंदी असणार असल्याचे माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी म्हटले आहे.
 
हा परिसर पावसाळी हंगामात पुणे- मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हाणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची हानी होऊ शकते. या कारणांमुळे १७ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीकरिता माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.
  
alibag
 
त्यानुसार नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे, याठिकाणी मद्यसेवन करणे यावर बंदी आहे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दर्‍यांचे कठडे, धोकादायक वळणे, याठिकाणी सेल्फी काढणे, चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणार्‍या ठिकाणी फोटोग्राफी करणे, रिल्स व्हिडीओ बनविणे.
 
धोकादायक खोल पाण्यात उतरणे व पोहणे, धबधब्याच्या झोताखाली बसणे. धोकादायक स्थिती निर्माण होईल अगर जीवितहानी होईल, रहदारीच्या आणि धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ टाकणे यावर बंदी आहे. तसेच कचरा, काचेच्या व प्लॅस्टीकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे.
 
महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, असभ्य व अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात डी.जे.सिस्टिम वाजवणे, ध्वनीप्रदूषण करणे. धरण, तलाव, धबधब्याच्या १ कि.मी. परिसरात दुचाकी,तीन चाकी,चार चाकी, सहा चाकी वाहनांनी प्रवेश करणे (अत्यावश्यक सेवा वगळून), यावर प्रशासनाने बंदी घातली आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सानप यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0