पेण | पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उच्च न्यायालयाने उठविल्यानंतर पेण तालुक्यातील जोहे, हमरापूर, कळवे विभागातील गणेश मूर्तीकारांनी ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. सदर मिरवणुकीत शेकडोंच्या संख्येने कारखानदार व कुटुंबीय सहभागी झाले होते. हमरापूर-जोहे हा भाग गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे हजारो गणेशमूर्ती तयार केल्या जातात. या गणेशमूर्तींना राज्यासह देशात तसेच परदेशात देखील मोठी मागणी आहे.
या परिसरातील दहा गावांत गणेशमूर्ती निर्मिती उद्योग बहरला आहे. दरवर्षी येथे जवळपास १०० कोटींची उलाढाल होते. अनेक सुशिक्षित बेरोजगार या मूर्ती व्यवसायावर आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. उच्च न्यायालयाने जानेवारीत पीओपी मूर्ती निर्मितीवर बंदी घातल्याने मूर्तिकार चिंतेत होते. हा व्यवसाय संपण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू होता.
मात्र, ९ जून रोजी उच्च न्यायालयाने दोन फुटांपर्यंत गणेश मूर्ती बनविणे व विक्रीची बंदी उठविली आहे. त्यामुळे गणेश मूर्तिकार व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. म्हणून पेण तालुक्यातील जोहे, हमरापूर, तांबडशेत, कळवे विभागातील मूर्तिकारांनी मंगळवारी (१७ जून) ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे व हमरापूर विभाग श्री गणेश उत्कृर्ष मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वच नेत्यांचे आभार मानले.
सदर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, हमरापूर विभाग श्री गणेश उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील, उपाध्यक्ष कृष्णा गोलिमडे, रवींद्र पाटील, नितीन मोकल, कृणाल पाटील, खजिनदार कैलास पाटील, राजन पाटील, शंकर मोकल, रवींद्र मोकल, संदेश कदम, सचिन पाटील, अतुल भगत, विनोद नाईक, विनोद म्हात्रे, सुयोग मोकल आदींच्या नेतृत्त्वाखाली न्यायालयाच्या निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी हमरापूर गावातील बहिरीदेव मंदिरापासून तांबडशेत, जोहे, कळवेपर्यंत ही मिरवणूक वाजतगाजत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.