विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या...मैथिली पाटीलवर अंत्यसंस्कार

18 Jun 2025 19:26:16
panvel
 
पनवेल | अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पनवेल न्हावा येथील मैथिली पाटील या तरुणीवर मंगळवारी (१७ जून) अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या २३ वर्षांच्या लाडक्या लेकीचे पार्थिव पाहून आईने अक्षरशः हंबरडा फोडला. नातेवाईक आणि गावकरी गहिवरुन गेले होते, अश्रूंचा महापूर आला होता. "राधे...राधे” म्हणत कृष्णभक्त असलेल्या मैथिलीला शेवटचा निरोप देण्यात आला. न्हावा येथील रहिवासी असलेली मैथिली एअर होस्टेस होती. दुर्दैवाने, १२ जून रोजी झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.
 
सहा दिवसांनंतर मैथिली पाटील हिचे पार्थिव मंगळवारी सकाळी पनवेलमधील तिच्या गावी आणण्यात आले. या घटनेच्या आदल्या दिवशी, मैथिली कुटुंबासोबत जेवण करुन अहमदाबादला गेली होती. दुसर्‍या दिवशी, तिने आईला विमानातून फोन केला. मात्र हा फोन शेवटचा ठरला आणि विमान अपघातात तिने आपला जीव गमावला. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच तिची आई आणि इतर नातेवाईक तातडीने अहमदाबादला रवाना झाले.
 
panvel
 
अनेक मृतदेह जळाल्यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण होते. त्यामुळे, मैथिलीच्या आई-वडिलांची डीएनए चाचणी करण्यात आली. डीएनए जुळल्यानंतर, सोमवारी (१६ जून) मैथिलीचा मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आला होता. मैथिलीचा मृतदेह रात्री उशिरा कुटुंबियांच्या ताब्यात मिळाला. त्यानंतर, मंगळवारी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी कुटुंबीय अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना झाले. सकाळी ७ वाजता ते मुंबई विमानतळावर पोहोचले आणि तेथून पनवेल न्हावा येथील घरी आले.
 
शेवटच्या दिवशी हसत गेलेली मैथिली आज मात्र कुटुंबीय आणि नातेवाईकांना रडवत घरी आली, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. गावातील स्मशानभूमीत मैथिलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मैथिलीला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. मैथिलीला अखेरचा निरोप देण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, यांच्यासह नातेवाईक, मैथिलीच्या मैत्रिणी, तिच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण गाव यावेळी शोकसागरात बुडाला.
 
शेकडो वाहनांचा ताफा, अंत्ययात्रेला लागलेली गर्दी, राधे राधेसह "मैथिली तुझं स्वप्न आम्ही पूर्ण करु!” अशा घोषणांनी मैथिलीला अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये हवाई सुंदरी म्हणून काम करणार्‍या मैथिली पाटील हिचे वडील मोरेश्वर पाटील ओएनजीसी कंपनीत काम करतात. मैथिली त्यांची मोठी मुलगी होती. तिने बारावीपर्यंत शिक्षण टी. एस. रेहमान कॉलेजमध्ये घेतले. त्यानंतर एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करुन तिने एअर इंडियामध्ये नोकरी सुरु केली होती. दोन वर्षांपासून ती एअर इंडियामध्ये कार्यरत होती.
 
 
Powered By Sangraha 9.0