जे.एम.म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चरवर ईडीची धाड , पनवेल येथील वनजमीन घोटाळाप्रकरणी कारवाई

18 Jun 2025 20:37:38
panvel
 
पनवेल | पनवेल तालुक्यातील वहाळ गावात झालेल्या शासकीय वनजमीन बळकावण्याच्या प्रकरणात ईडी मुंबई झोन-२ मार्फत जे.एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे संचालक जे.एम. म्हात्रे यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर मंगळवारी (१७ जून) सकाळपासून छापेमारी सुरू आहे. ही कारवाई उरण (अलिबाग विभाग) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवर आधारित आहे. याप्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
त्यानंतर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराच्या अनुषंगाने याप्रकरणी रिपोर्ट दाखल करून तपास सुरु केला. वनविभागाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २००५ मध्ये म्हात्रे यांच्याकडून बनावट सातबारा नोंदी करून पनवेल तालुक्यातील वहाळ येथील वनजमीन बेकायदेशीरपणे मिळविण्यात आली. या जमिनीतून १.८६ हेक्टर जमीन म्हात्रे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विक्री केली आणि त्यासाठी त्यांना ४२.४० कोटींचा मोबदला मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.
 
तसेच, सय्यद मोहम्मद अब्दुल हमीद कादरी यांनी गट क्रमांक ४२७/१ मधील ०.४२२५ हेक्टर जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित केली आणि त्याबदल्यात ९.६९ कोटी रुपये घेतले, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. या घोटाळ्याशी संबंधित "प्रोसिड्स ऑफ क्राईम” म्हणजेच आर्थिक गैरव्यवहारातून मिळालेली मालमत्ता शोधण्यासाठी ईडीकडून पनवेलमधील दोन ठिकाणी व मुंबईतील दादर येथील एका ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
 
या प्रकरणात संबंधित व्यक्तींवर भारतीय दंड संहिता, वन कायदा तसेच प्रतिबंधक आर्थिक व्यवहार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून ईडीने या आर्थिक घोटाळ्यातील साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या ईडीकडून जमिनीचे मूळ दस्तऐवज, आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती, तसेच तत्कालीन व्यवहारांमागील संगणकीय डेटा जप्त केला जात आहे. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, या कारवाईतून राजकीय आणि प्रशासकीय साठेबाजांशी असलेले संबंध उघड होण्याची शक्यता आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0