प्रभागरचना कार्यक्रम जाहीर , स्थानिक संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत ?

14 Jun 2025 12:51:25
 poladpur
 
पोलादपूर | महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत होतील असे चित्र आता दिसू लागले आहे. निवडणूकांपूर्वी ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १४ जुलै २०२५ रोजी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 
या प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना २१ जुलैपर्यंत मा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर होणार असून जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्त यांना २८ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त यांनी ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी देऊन निर्णय देणार असून अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालयातून १८ ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍याकडे सादर करावयाच्या सूचना देण्यात आल्या आहेत यासंदर्भातील परिपत्रक एकनाथ डवले, प्रधान सचिव (महाराष्ट्र शासन) यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आले आहे.
 
यामुळे राजकीय घडामोडींना गती मिळणार असून राजकीय घडामोडीना वेग येणार आहे. स्थानिक पातळीवर सत्तेचा मजबूत आधार उभा करण्यासाठी राजकीय पक्ष आता रणनीती आखण्यात गुंतले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर २०२५ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजेल, अशी जोरदार शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0