आज पाच विदेशी विद्यापीठांना इरादापत्र देणार , नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी

14 Jun 2025 13:42:27
 new mumbai
 
नवी मुंबई | "मुंबई रायजिंग-क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे अधिकृतपणे प्रदान केली जाणार आहेत.
 
त्यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. इरादापत्र प्रदान समारंभ शनिवारी, १४ जून रोजी दुपारी १२ वाजता ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती लाभणार आहे. सिडकोमार्फत उभारल्या जाणार्‍या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार असून, हे शिक्षण विविध संस्कृतींच्या आदान-प्रदानाला चालना देईल आणि विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये सहकार्य व संवाद वाढवेल. आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ५ किलोमीटर परिसरात सर्वोच्च १० परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. ही देशातील पहिली अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी ठरणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0