खड्ड्यांमुळे त्रस्त तरुणांनी भररस्त्यात केले वटपूजन

11 Jun 2025 20:29:09
 alibag
 
अलिबाग | वटपौर्णिमेचे औचित्य साधून अलिबाग परिसरातील सत्यवानांनी प्रशासनाचे लक्षवेधी अनोखे आंदोलन केले. अलिबाग बायपास येथे पेण अलिबाग रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्यासाठी साकडे या सत्यवानांनी घातले.
 
गेले अनेक वर्षांपासून अलिबाग बायपास येथील खड्ड्यांची असणारी समस्या कायमची संपवून संभाव्य अपघाताला आळा घालण्यासाठीची मागणीदेखील स्थानिक नागरिकांनी केली. अलिबाग शहराच्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असणार्‍या अलिबाग-वडखळ रस्त्यावर अनेक वर्षे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हे खड्डे बुजविण्याचे अनेकदा प्रयत्न झाले आहेत. लोकप्रतिनिधींनी खड्डे बुजविण्याची मागणीदेखील केली आहे.
 
परंतु या मागणीला आणि प्रयत्नाला शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. या रस्त्यावर सुमारे ३ फुटांचे खड्डे पडले आहेत. पाऊस असल्यावर या खड्ड्यांमध्ये पाणी साचून तळे तयार होते. याचा नाहक फटका वाहनचालकांना बसत आहे. मंगळवारी (१० जून) वटपौर्णिमेचे औचित्य साधून अलिबाग येथील काही सत्यवानांनी भररस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्येच वटपूजन करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. या तरुणांनी वाहनचालकांचे प्राण वाचविण्याचे साकडे घालून अधिकारीवर्गाला सद्बुद्धी देण्याची विनवणी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0