तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी (८ मे) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रहाटाड येथून एसटी बस तळा येथे जात होती. बस तळा शहराजवळच तारणे येथील एका धोकादायक वळणावर आली असता आगरदंडाच्या दिशेने जाणार्या डम्परने एसटीला जोरदार धडक झाली. या अपघातात तृप्ती खुटीकर, लक्ष्मण ढेबे, अनन्या गवाणे, विठ्ठल कजबजे या ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहेत. हे सर्वजण खांबवली, रहाटाड, रहाटाडवाडी, धनगरवाडी येथील रहिवासी आहेत. तर २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक व शहरातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गाडीतून जखमी प्रवाशांना बाहेर काढले व हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. एस्?टीत जवळपास ४५ च्या वर प्रवासी प्रवास करत होते. बसचालक सचिन बोरकर याने प्रसंगावधान राखून गाडी कंट्रोल केली; अन्यथा आणखी जीवितहानी झाली असती अशी भीती प्रवासी व्यक्त करत होते.
अपघाताची माहिती मिळताच माणगांवचे विभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक संदीप बोर्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तळा सहा.पोलीस निरीक्षक सतीश गवई, एपीआय पाटील, विष्णू तिडके, पौर्णिमा साळुंके सहकारी यांनी मदत केली. दरम्यान राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत व जखमींवर सरकारी खर्चांने उपचार करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.