कर्जत | तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या कोथळी गडाच्या पायथ्याशी एका नर जातीच्या बिबट्याचा डोहात पडून मृत्यू झाला. शिकार करताना तो पडला असावा आणि दगडावर जोरदार आपटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय वन विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. या बिबट्याचे वय सुमारे तीन वर्षे एवढे आहे.
वन विभागाच्या अधिकार्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्यावर अंत्यसंस्कारदेखील करण्यात आले. पेठ-आंबिवली गावात मंगळवारी, ६ मे रोजी ही घटना घडली. गडाच्या पायथ्याला शिवशंकर फामर्?स या खाजगी जमिनीलगत दगडाच्या खोल भागात साठलेल्या पाण्याच्या डोहात बिबट्या मृत अवस्थेत स्थानिक ग्रामस्थांना दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच कर्जत पूर्व परिक्षेत्रातील वन विभागाचे अधिकारी प्रदीप चव्हाण घटनास्थळी वन कर्मचारी घेऊन पोहचले होते.
यावेळी पनवेल उपविभागीय वन अधिकारी सागर माळी हेदेखील उपस्थित होते वन अधिकारी चव्हाण म्हणाले, बिबट्याज्या ठिकाणी पाण्यात बुडाला आहे, त्याची खोली आणि परिसर पाहता तो पाण्यात बुडाला, असे वाटत नाही. घडलेल्या ठिकाणाहून त्याला सहज पाण्याबाहेर पडणे शक्य होते. जंगल परिसरात रात्रीच्या वेळी भक्ष्याची शिकार करताना तो या डोहात पडला व डोक्याला दगडाचा मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे त्यांनी म्हटले आहे.
तीन ते चार दिवस पाण्यात बुडून राहिल्याने त्याचे शरीरदेखील कुजले आहे. पाण्यात बुडालेल्या या बिबट्याचा मृतदेह बाहेर काढण्यात खोपोली येथील आऊल्स ऍनिमल रेक्सू टीम यांनी सहकार्य केले. मृत बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सरगर यांनी शवविच्छेदन करून वन विभागाला अहवाल सादर केल्यानंतर बिबट्याच्या मृतदेहाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.