पनवेल | एका माजी सैनिकाने वयाच्या ४८ व्या वर्षी बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवून आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पुन्हा सुरु केले. विशेष म्हणजे त्यांच्या मुलीलासुद्धा सायन्स मध्ये ७५ टक्के गुण मिळाले आहेत. मुलगी आणि वडील दोघांनी सारखेच गुण मिळवून यश संपादन केले आहे. किरण अर्जुन गोरे हे माजी सैनिक असून सध्या महसूल विभागात तहसीलदार कार्यालय पेण येथे महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत.
सन १९९३ साली दहावी पास झाल्यानंतर आयटीआयला प्रवेश घेतला तीन वर्षे आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण करून लगेचच सन १९९६ साली आर्मीमध्ये भरती झाले. २०१३ साली १६ वर्षे देशाची सेवा करुन आर्मीमधून निवृत्त झाले. त्यानंतर शासनाची सरळ सेवा विभागाची परीक्षा देऊन महसूल विभागात रुजू झाले.यादरम्यान त्यांचे दहावीनंतरचे पुढील शिक्षण घेणे राहुन गेले. आपल अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या बारावी सायन्समध्ये शिकत असलेल्या मुलीसोबत परीक्षा द्यायची ठरवली आणि वावोशी हायस्कूल खालापूर ह्या आपल्याच शाळेतून कला शाखेतून १७ नंबरचा (बाहेरून) फॉर्म भरून परीक्षा दिली.
परीक्षेच्या वेळेस दिवसरात्र विधानसभा निवडणुकीचे काम आणि इतर सर्व जबाबदारी सांभाळून जिद्दीने अभ्यास केला आणि परीक्षेत ७५% गुण मिळवून वावोशी हायस्कूल ता.खालापूरमध्ये शाळेत पहिला नंबर काढला. एका माजी सैनिकाने वयाच्या ४८ व्या वर्षी घवघवीत यश मिळवून आपले अर्धवट राहिलेले शिक्षण सुरू केले.
तसेच त्यांच्या मुलीलासुद्धा सायन्समध्ये ७५ टक्के गुण मिळाले आहेत. मुलगी आणि वडील दोघांनी सारखेच गुण मिळवून यशसंपादन केल्यामुळे त्यांचे नातेवाईक आणि समाजामध्ये आणि महसूल प्रशासनामधून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. या यशाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन केले जात असून, त्यांना शाळेचे शिक्षक कुटुंब आणि मित्रांची चांगली साथ मिळाली, असे ते सांगतात.