जिल्ह्यातील तीन लाचकोंबडे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात!

08 May 2025 17:09:22
 alibag
 
अलिबाग | जिल्ह्यात अलिबाग आणि रोहा अशा दोन ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांमध्ये एका मंडळ अधिकार्‍यासह दोन लाचखोर तलाठी जाळ्यात अडकले आहेत. वारस नोंद करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
अलिबागमध्ये मंडळ अधिकार्‍यासह तलाठी लटकला
अलिबाग | जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर वारस नोंदीसाठी प्रकरणाची कागदपत्रे जमा करण्याकरिता लाचखोरी केल्याप्रकरणी चौल-रेवदंडा येथील मंडळ अधिकारी विजय मापुसकर आणि रेवदंडाची तलाठी वसुंधरा धुमाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत, दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांनीही प्रत्येकी ५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. यातील तक्रारदार यांना एका महिलेने तिच्या रेवदंडा आगरकोट येथील जमिनीचे अखत्यारपत्र दिले आहे.
 
यासंदर्भात जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर वारस नोंद करायची असल्याने तक्रारदार रेवदंडा येथील मंडळ अधिकारी कार्यालयात गेले. तेव्हा याबाबतची कागदपत्रे दाखल करण्यासाठी मंडळ अधिकारी विजय मापुसकर (रा.चेंढरे, अलिबाग) आणि रेवदंडा सजाची तलाठी वसुंधरा धोंडू धुमाळ (रा.चेंढरे, अलिबाग) यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.यासंदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग येथील कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली असता दोघांनीही लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन बुधवारी (७ मे) सापळा रचण्यात आला. तलाठी वसुंधरा धुमाळ यांनी लाचेची ५ हजार रुपये इतकी रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचसाक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली. तसेच मंडळ अधिकारी विजय मापुसकर यांनी लाचेची रक्कम नंतर आणण्याचा इशारा केला.
 
तलाठी धुमाळ या लाचेची रक्कम घेऊन कार्यालयातून निघून जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर मंडळ अधिकारी विजय मापुसकर यांनी लाचेची मागणी केलेली असल्याने त्यांनाही पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक शशिकांत पाडावे यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार विनोद जाधव, अरूण करकरे, हवालदार महेश पाटील, सुषमा राऊळ, सागर पाटील यांनी ही कामगिरी पार पाडली.
 
Powered By Sangraha 9.0