रोहा-अष्टमी | जमीन मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी तालुक्यातील भालगाव सजा कार्यालयातील तलाठ्याला दहा हजारांची लाच स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. फिरोज इलाही मुजावर (वय ३० असे ताब्यात घेतलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
कांडणे येथील एका शेतकर्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेली जमीन मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी त्यांच्या पत्नीने आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज तलाठी कार्यालयात सादरकेला होता. त्याचा पाठपुरावा तक्रारदार करीत होते. तक्रारदार हे चौकशीसाठी भालगाव तलाठी कार्यालयात गेले असता तलाठी फिरोज इलाही मुजावर याने त्यांच्याकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली.
याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.त्यानुसार मंगळवारी (६ मे) सायंकाळी भालगाव तलाठी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. या दरम्यान भालगाव तलाठी कार्यालयात तक्रारदाराकडे मागणी केलेली लाचेची रक्कम रु.१० हजार रुपये पंच साक्षीदारांसमक्ष स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.
रोहा पोलीस ठाण्यात तलाठी फिरोज मुजावर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक नितीन दळवी नितीन पवार, गिरासे, योगीराज नाईक, दिपाली सावंत, योगिता चाळके, रतन गायकवाड यांच्या पथकाने सदर कारवाई केली.