इकोची स्कुटीला धडक; तरुणीचा मृत्य , माणगाव मुगवली फाटा येथील दुर्घटना

By Raigad Times    08-May-2025
Total Views |
 mangoan
 
माणगाव | भरधाव वेगाने येणार्‍या मारुती इको गाडीची अँटिव्हा दुचाकी गाडीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू होऊन चालकासह दोन जण जखमी होऊन दुचाकीचे नुकसान झाले. सदरील अपघात हा मंगळवारी, ६ मे रोजी रात्री ८.३० वाजता माणगाव तालुयातील गारळ गावच्या हद्दीत हॉटेल कोकण सम्राटजवळ मुंबई-गोवा महामार्गावर मुगवली फाट्याजवळ घडला.
 
या अपघाताची फिर्याद दुचाकी चालक वैभव सुभाष भोजने (वय-२५) रा. देवळी कोंड, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यातील एक राखाडी रंगाची मारुती इको गाडी (क्रमांक माहिती नाही) यावरील अनोळखी चालक त्याच्या ताब्यातील ही गाडी गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे अतिवेगात चालवीत घेऊन येत असताना मुगवली फाट्यावर समोरून येणार्‍या होंडा अँटिव्हा दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली.
 
चालक उजव्या बाजूचा इंडिकेटर देऊन उजव्या बाजूला वळत असताना इको गाडीवरील चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सलोनी संजय भोसले (वय-१८, रा. देवळी कोंड) या तरुणीचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक वैभव सुभाष भोजने (वय- २५) व जान्हवी संतोष उंडरे (वय १८) दोन्ही रा. देवळी कोंड ते दोघे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव तालुयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे व पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
 
या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात इको चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब), मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ प्रमाणेदाखल करण्यात अली आहे. सदर अपघाताचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.