बोर्लीपंचतन | श्रीवर्धन तालुयातील बोर्लीपंचतन गावाला पाणी पुरवठा करणार्या कार्ले नदी लगत असणार्या विहिरींच्या परिसरातील नदी पात्रामध्ये अवैधरित्या खोल खड्डे खणून रेजग्याचा उपसा होत असल्याने नदीपात्रातील पाणी गढूळ होण्याबरोबरच नदीपात्रालगत गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या विहिरींमधील पाण्याची पातळीसुध्दा कमी होत असून पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे.
या नदीपात्राला लागून बोर्ली पंचतन, दिवेआगर आणि भरडखोल ग्रामपंचायतींनी आपापल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी बांधल्या असून उन्हाळ्यामध्ये या विहिरींची पाणी पातळी वाढून गावांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी लघुपाटबंधारे विभागाच्या कार्ले धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येतं.
नदीपात्रामध्ये अवैध रेजग्याचं उत्खनन, विविध व्यावसायिकांद्वारे होणारा पाण्याचा उपसा, गाड्या धुणे यामुळे याचा एकत्रित परिणाम या तीन गावांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. याचा गांभीर्याने विचार करुन नदीपात्रात अवैध रेजगा व पाण्याचा उपसा करणार्यांवर योग्य ती कारवाई करावी असे आवाहन बोर्ली पंचतन ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर नागे व ग्रामपंचायत अधिकारी शंकर मयेकर यांनी महसूल प्रशासनाला केलं आहे.