उरणमध्ये ‘ऑपरेशन अभ्यास’ यशस्वी , युद्धजन्य परिस्थितीत स्वत:ला कसे वाचवायचे? याची प्रात्यक्षिके

सायरन वाजला...आणि ‘मॉकड्रील’ सुरु

By Raigad Times    08-May-2025
Total Views |
uran
 
उरण | पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचाच भाग म्हणून अतिमहत्त्वाच्या ठिकाणी बुधवारी (७ मे) मॉक ड्रिल करण्यात आले. यात उरणमधील सात ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’ करण्यात आला.
 
युद्धजन्य परिस्थितीत स्वत:ला कसे वाचवायचे? इतरांवर कसे उपचार करायचे? आगीतून कसे वाचायचे? पोलीस-रुग्णालय-प्रशासन यांनी कशी कामे करायची? याचा परिपाठ यानिमित्ताने पाहायला मिळाला. दुपारी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवल्यानंतर उरण शहरातील तहसील कार्यालय, ओएनजीसी कॉलनी, ग्रुप ग्रामपंचायत चाणजे, जीटीपीएस कंपनी, बारमर लॉरी, अल कार्गो कंपनी आणि बल्क गेट कंपनी मोरा या ठिकाणी सायरन वाजविण्यात आले.
 
uran
 
तर एनआय स्कूल, पंचायत समिती येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल करण्यात आले. नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक आणि इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा आणि नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृह विभागाच्या सूचनेनुसार उरण शहरात रात्री ८ वाजता ब्लॅक-आऊट प्रकियेचीची रंगीत तालीम करण्यात आली. त्यावेळी १० मिनिटे वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. याला उरणकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या संपूर्ण कालावधीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

...म्हणून उरणची निवड
उरण हे समुद्रकिनारी वसलेले शहर आहे. येथे आशिया खंडातील सर्वात मोठे जेएनपीए बंदर आहे. तसेच ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएल अशा अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यांच्याही सुरक्षिततेला मोठा धोका आहे. समुद्रकिनारी नौदल आहे. येथे विविध शस्त्र, बॉम्ब गोळे, रॉकेट, स्फोटके बनवले जातात.
 
उरणमध्ये शस्त्राचे मोठे भांडार आहे. सागरी, रस्ते आणि रेल्वे मार्गाचे जाळेही आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेला उरण हा तालुका अतिसंवेदनशील तालुका आहे. या पार्श्वभूमीवर देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सावधगिरी कशाप्रकारे बाळगावी? यासाठी प्रशासनाच्यावतीने हे मॉकड्रील घेण्यात आले. यावेळी नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
 
uran
 
मॉकड्रीलवेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, खासदार धैर्यशील पाटील, न्हावा शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ. विशाल नेहूल, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव, तहसीलदार उद्धव कदम, मोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे, सैन्यदलाचे अधिकारी सन्नी राणा, एनसीसीचे ट्रेनिंग ऑफिसर संजय पाटील, कॅप्टन आर. एस. जमनुके, फायर ब्रिगेड, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
मॉकड्रीलच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर
मॉर्कड्रिलच्या पार्श्वभूमीवर उरणमधील सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोड वर होत्या. उरणमधील उरण नगर परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय, उरण पोलीस स्टेशन, महसूल कार्यालये, सिडको कार्यालये, उरण मधील ग्रामपंचायत आदी महत्वाचे शासकीय कार्यालयांनी गृह मंत्रालय व जिल्हाधिकारी रायगड यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत, जनतेत जनजागृती करत मॉर्क ड्रिल मध्ये सामील झाले. सर्वच शासकीय कार्यालयांनी मॉक ड्रिल बाबतीत पूर्ण पाठिंबा व जाहीर समर्थन केले असल्याचे दिसून आले.सर्वच शासकीय कार्यालये अलर्ट मोडवर असल्याचे यावेळी दिसून आले.
ऑपरेशन सिंदूरला उरणमधील नागरिकांचे जाहीर समर्थन
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने मंगळवारी मध्यरात्री पाकव्याप्त कश्मीरमधील ९ दहशतवादी तळावर क्षेपणाशस्त्रे डागली. भारतीय सैन्य दलाकडून ऑपरेशन सिंदूर नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भारताने केलेल्या या क्षेपणाशस्त्र हल्ल्यात २ लहान मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
या कारवाईत पाकिस्तान व पाकिस्तान व्याप्त कश्मीरमधील दहशतवादयांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले होते. उरणमधील नागरिकांनीही दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा व समर्थन दिल्याचे चित्र उरण मध्ये पहावयास मिळाले.
एनआय हायस्कूल येथे मॉकड्रिल घेण्यात आले. अन्य ठिकाणी सायरन वाजविण्यात आले. ज्यावेळी एअर स्ट्राईक होतो त्यावेळी सायरन वाजविले जा- तात. ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी सायरन वाजवून नागरिकांना अलर्ट केले जाते. मॉकड्रिल घेण्याचा उद्देश नागरिकांना सतर्क करणे व काय काळजी घ्यावी, कोणती काळजी घ्यावी याची माहिती देणे आहे.एकंदरीतच मॉक ड्रिल उरणमध्ये यशस्वी झाला. - डॉ. विशाल नेहूल, न्हावा शेवा बंदर विभाग, सहाय्यक पोलीस उपायुक्त,