पेणमध्ये रेल्वेच्या धडकेत पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

By Raigad Times    07-May-2025
Total Views |
 pen
 
पेण | पेण परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. सुखसागर सोसायटी, चिंचपाडा, पेण येथे राहणारे पोलिस कर्मचारी रुपेश पांडुरंग भोनकर (वय ५०) यांचा मत्स्यगंधा एक्सप्रेस (रेल्वे क्र. १२६१९) च्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर रेल्वे गाडी मुंबईहून मेंगलोरकडे जात असताना, पेण हद्दीतील अंतोरे रेल्वे ब्रिज जवळ भोनकर यांना जोरदार धडक बसली.
 
धडक एवढी भीषण होती की त्यांचे शरीर अक्षरशः छिन्नविछिन्न झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र पेण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी संध्याकाळी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली. मात्र पुढील तपासात समोर आले की मृत व्यक्ती रायगड पोलिस दलातील कर्मचारी आहेत.