कर्जत | नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेन बंद असल्याने पर्यटक हे मिनीट्रेन म्हणून प्रवासी गाडीची वाट पाहत असतात. त्यात तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ असते. परिणामी पर्यटकांमध्ये धक्काबुक्की होण्याची घटना माथेरान अमन लॉज या ठिकाणी झाली आहे. माथेरानमध्ये सध्या मिनीट्रेन बंद आहे. त्यामुळे हे सर्व पर्यटक माथेरान अमनलॉज दरम्यान चालविल्या जाणार्याशटल गाडीमधून प्रवास करता यावा, यासाठी माथेरान आणि अमनलॉज स्थानकात तासनतास थांबून शटल गाडीचे तिकीट मिळवत असतात.
तासभर तिकीटाच्या लाईनमध्ये उभे राहून तिकीट मिळाले नाही की पर्यटकदेखील नाराज होतात. अशीच नाराजी अमनलॉज स्थानकात पहायला मिळाली. अमनलॉज माथेरान शटल गाडीचे तिकीट मिळविण्यासाठी तिकीटाच्या रांगेत असलेल्या पर्यटकांना तिकीट मिळण्यात आलेल्या अडचणीमुळे रांगेत उभे असलेल्या पर्यटकांमध्ये धक्काबुक्की आणि नंतर हाणामारीची घटना घडली.
दरम्यान, दोन गटांतील १५-२० पर्यटकांमध्ये अमनलॉज स्थानकातील तिकीट खिडकीसमोर धक्काबुक्की आणि हाणामारी होत असताना मध्य रेल्वे प्रशासनाचा एकही कर्मचारी प्रवाशांची भांडणे थांबविण्यासाठी पुढे आला नाही. तसेच रेल्वे प्रशासनातील एकही सुरक्षाकर्मीदेखील हा प्रकार सुरु असताना तेथे उपलब्ध नव्हता.