अलिबाग | दैवीक शक्तीची भीती दाखवून जादूटोणा करत, पनवेल येथील ठेकेदारासह तिघांकडून ४२ लाख रुपये, एक थार गाडी आणि जेसीबी लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
अलिबाग ठिकरुळ नाका येथे राहणार्या महेश योगेश्वर मोरे (वय ५३), मिहीर मांजरेकर उर्फ मिहीर मोरे (वय २४), अपूर्वा महेश मोरे (वय ५०) आणि सागर यशवंत कुंड (वय ३४, रा. चेंढरे, ता.अलिबाग) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनी पनवेल तालुक्यातील कळंबोळी गावातील येथे राहणार्या गणेश जनार्दन कडव या ठेकेदाराची फसवणूक करुन त्यांचे ३८ लाख ५० हजार रुपये, नितीन पाटील यांचे १ लाख २९ हजार व विघ्नेश विलास सुर्वे यांचे २ लाख २५ हजार रुपये, एक थार गाडी व एक जेसीबी अशी वाहने लाटून त्यांचा अपहार केला.
ठिकरुळ नाका येथील राहत्या मोरे यांच्या घरी असलेल्या देवशिलेवर लोकांना उभे करुन व पांढर्या सुती धाग्याचे तुकडे करुन, हा अघोरी प्रकार करत चौघांनी ही फसवणूक केली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर चौघांवर फसवणूक, अपहारासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ अन्वये गुन्हे दाखल करत तिघांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. बुधवारी (२८ मे) त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.