अलिबाग | पावसात भिजू नये म्हणून गाडी शेडमध्ये लावण्याचे निमित्त. दोन कुटुंबांमधील जुना वाद उफाळून आला आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वादाचे पर्यावसान जीव घेण्यापर्यंत गेले. अलिबाग तालुक्यातील आवास येथील एका ३२ वर्षीय तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटक केल्यानंतर या सर्वांना अलिबाग सत्र न्यायालयात हजर केले होते.
त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२२ मे) रात्री पाऊस सुरू झाला. पावसाचे पाणी गाडीत घुसत असल्याचे लक्षात येताच, आवास येथील विवेक नंदकुमार राणे (वय ३४) व कुटुंबीय त्यांची चार चाकी गाडी त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये लावत होते. यावेळी संशयित देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे व अन्य पाचजण त्याच्याशी वाद करू लागले.
याचे कारण त्यांच्यातील जुने भांडण होतेच, वाद टोकाला पोहचला होता. या वादातून राणे कुटुंबीयांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला. विवेक नंदकुमार राणे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव म्हात्रे व अंकित राणे यांनी, धर्मेंद्र नंदकुमार राणे (वय ३२) यास पकडून ठेवले आणि संशयित देवेंद्र म्हात्रे याने त्याच्या छातीमध्ये चाकू भोसकून त्याची निर्घृण हत्या केली. तसेच त्यांना सोडवायला गेलेला विवेकचा भाऊ विश्वास यालादेखील ठारच मारतो असे बोलून त्याच्याही छातीत चाकू भोसकला.
विवेक नंदकुमार राणे यांना वैभव म्हात्रे यांनी पकडून संशयित सिया म्हात्रे यांनी त्यांच्या पाठीमागे कमरेवर सुरा मारला. त्यावेळी राणे यांची आई पकडण्याकरिता गेली असता पूनम म्हात्रे या महिलेने विवेक यांच्या आईच्या मानेवर सुरा मारून त्यांना गंभीर दुखापत केली. या वादात धर्मेंद्र नंदकुमार राणे (वय ३२ रा.राणे आळी, आवास) याचा मृत्यू झाला असून विवेक नंदकुमार राणे, विश्वास नंदकुमार राणे आणि करुणा नंदकुमार राणे हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पुनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे या सहा जणांवर गुन्हा दाखल करुन या पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी दिली आहे. तर जखमींवर अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.