रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; आंचल दलाल रायगडच्या नव्या पोलीस अधीक्षक

23 May 2025 12:45:41
 alibag
 
अलिबाग | रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली असून रायगड पोलिस अधीक्षकपदी आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंचल दलाल या पुण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा दलात कार्यरत होत्या. राज्य पोलीस दलातील २२ पोलिस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये रायगड पोलीस अधीक्षक घार्गे यांची बदली करण्यात आली आहे.
 
त्यांच्या जागी आंचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंचल दलाल यांचे पती जितेंद्र डुडी हे आयएस अधिकारी असून ते पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आंचल यांचा परिवार गाझियाबादमध्ये राहतो. त्यांचेवडील दूरसंचार विभागात जीएम होते. २०१८ मध्ये त्या आयपीएस झाल्या. सातारा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना आंचल दलाल यांनी अनेक दबंग कारवाया केल्या आहेत.
 
निर्भया पथकाचे काम पाहताना, त्यांची मोठी चर्चा झाली होती. मटका, जुगार अडड्यांवर त्यांनी मोठ्या कारवाया केल्या. महाविद्यालयांसमोर होणारे छेडछाडीचे प्रकारही त्यांनी आटोक्यात आणले होते. पुणे येथील राष्ट्रीय सुरक्षा दलात काम केल्यानंतर आता त्यांची रायगड पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकार्‍यांचा खांदेपालट करण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0