महाडमध्ये गांजाची शेती पोलिसांकडून उद्ध्वस्त; एकजण अटकेत

परसबागेत केली होती गांजाची लागवड

By Raigad Times    21-May-2025
Total Views |
mahad
 
महाड | तालुक्यातील भिसेवाडी येथे आपल्या परसबागेत गांजाची शेती करुन त्याची विक्री करणार्‍याला महाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुक्यातील मोहोत, भिसेवाडी येथील शाम सिताराम भिसे, वय ६१ हा इसम आपल्या परसबागेमध्ये गांजाची बेकायदेशीर शेती करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
 
त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या पथकाने सोमवारी, १९ मे रोजी घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणी पाच ते सहा फुट उंच उगवलेली उग्र वासाची ओलसर सोळा झाडे व त्या झाडांचे कापणी तुकडे करून पांढर्‍या रंगाच्या प्लास्टिकच्याकोठ्यात वजन केले असे एकूण वजन २ किलो ४८ ग्रॅम निव्वळ गांजाचे वजन १ किलो ९८८ ग्रॅम एकूण आढळून आले.
 
या कारवाईत जवळपास ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भिसे यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मुंढे हे करीत आहेत. दरम्यान, गांजा शेतीच्या प्रकरणानंतर महाड तालुक्यात खळबळ उडली आहे.