१ जूनपासून ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी

By Raigad Times    21-May-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अध्यादेश, २०२१ अन्वये यावर्षी दि.१ जून ते ३१ जुलै २०२५ (दोन्ही दिवस धरुन ६१ दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय संजय पाटील यांनी केले.
 
पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. सदर पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणार्‍या बिगर-यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका १ जून २०२५ पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच ३१ जुलै २०२५ वा त्यापुर्वी सदर नौकांना समुद्रात मासेमारीकरीता जाता येणार नाही.
 
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनार्‍यापासून १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणार्‍या नौकांना हे आदेश लागू राहणार आहेत. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनार्‍यापासुन १२ सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल.
 
पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. अधिक माहितीकरिता कार्यालयाचा पत्ता अलिबाग कोळीवाडा, बंदररोड, कस्टम हाऊस जवळ, अलिबाग दूरध्वनी क्र.०२१४१- २९५२२१.