पेण | पहेलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना चोख देणार्या भारतीय दिलेल्या जवानांना तसेच त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी १८ मे रोजी पेण शहरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत माजी सैनिकांसह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता.
ही रॅली महात्मा गांधी वाचनायल येथून सुरू होऊन राजू पोटे मार्ग, बाजारपेठ शिवाजी चौक, नगरपालिका नाका अशी संपूर्ण पेण शहरात फिरली. यावेळी संपूर्ण पेण शहर देशाच्या गौरव गीतांनी निनादून गेले होते. रॅलीत खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलिमा पाटील, माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, माजी नगरसेवक अनिरुद्ध पाटील यांसह जि.प. सदस्य, नगरसेवक आणि विशेष करून देशासाठी लढणार्या माजी सैनिकांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी खा. धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, आपल्या भारतीय जवानांचा पराक्रम संपूर्ण जगाने पाहिलेला असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सारे भारतीय नागरिक एकत्र येत आलो आहोत.
आम्ही देशाच्या रक्षणासाठी गेली अनेक वर्षे सीमेवर संघर्ष करत होतो. ज्या सीमेवर दहशतवाद्यांनी कुरघोडी सुरू केली आहे, त्याला आपल्या जवानांनी जशास तसे उत्तर दिले आहे. आम्ही निवृत्त झालो असलो तरी वेळ आली तर देशाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा सीमेवर जाऊन लढायला तयार आहोत. फक्त आम्हाला भारत सरकारने आदेश द्यावेत, आम्ही सारे माजी सैनिक लढण्यासाठी सज्ज आहोत. - सुरेंद्र ठाकूर, अध्यक्ष, माजी सैनिक सामाजिक संस्था