पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार , संतप्त महाडकर उतरले रस्त्यावर! नराधमाला फाशीची मागणी

By Raigad Times    20-May-2025
Total Views |
 mahad
 
महाड | महाड तालुक्यातील एका गावातील पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात सोमवारी, १९ मे रोजी तालुक्यातील हजारो जनता रस्त्यावर उतरली आणि प्रांत कार्यालयावर धडकली. पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा या मोर्चादरम्यान देण्यात आल्या.
 
बुधवारी, १४ मे रोजी रात्रीच्या सुमारास महाड तालुक्यातील विलास पांडुरंग हुलालकर या ४८ वर्षीय नराधमाने एका पाच वर्षीय बालिकेला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेनंतर त्या नराधमाला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.
 
या घटनेचे तीव्र पडसाद नागरिकांमध्ये उमटल्याने सोमवारी सर्व जनसमुदाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाला आणि तेथून प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाड पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी मोर्चेकर्‍यांशी संवाद साधून कोणत्याही परिस्थितीत आरोपीला पाठीशी घालणार नसल्याचे आश्वासन दिले.