माणगाव | तालुयातील बोरघर आदिवासीवाडी येथे मानेवर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या केल्याची घटना १८ मे रोजी रात्री ८.४० वाजताच्या सुमारास राहत्या घरासमोर घडली. या घटनेची फिर्याद नातू चंद्रकांत दौलत मुकणे (वय १९, रा. बोरघर आदिवासीवाडी ता.माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने तालुयात एकच खळबळ उडाली आहे.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत मुकणे हे घरात एकत्रित जेवण करीत असताना अक्षय चंद्रकांत मुकणे (वय २५, रा.बोरघर आदिवासीवाडी) याने शाबी दौलत मुकणे (रा.बोरघर आदिवासीवाडी) यांना शिवीगाळ केली. म्हणून शाबी यांनी याबाबत विचारणा केली असता, अक्षय मुकणे हा समोर आला आणि अरेरावी करू लागला. म्हणून भिमसेन दगडू मुकणे (वय ७० वर्षे) यांनी अक्षयला काठीने मारहाण केली.
त्यामुळे संतापलेल्या अक्षय याने त्याच्या कमरेला असलेल्या कोयत्याने चंद्रकांत मुकणे यांचे आजोबा भीमसेन मुकणे यांच्या मानेवर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या भीमसेन यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच तालुयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे, सहायक पोलीस निरीक्षक बेलदार, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अक्षय मुकणेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३५२ प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बेलदार हे करीत आहेत.