पाली | शिक्षण अर्धवट सोडले तरी जर जिद्द असेल, तर यश नक्कीच मिळते याचे जिवंत उदाहरण म्हणजे खारपाले येथील वृषाली पांडुरंग गायकर. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्या व त्यांचा मुलगा एकाचवेळी पास झाला असून वृषाली गायकर यांना मुलापेक्षा अधिक टक्के मिळाले आहेत.
काही कारणास्तव वृषाली यांना शिक्षण थांबवावे लागले होते. मात्र, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या सेकंड चान्स प्रोग्राम अंतर्गत त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. संस्थेने दिलेले मार्गदर्शन, क्लासेस, सराव आणि सततची पाठराखण यामुळे वृषाली यांनी आत्मविश्वासाने दहावीची परीक्षा दिली.
आणि थेट प्रथम संस्थेच्या सेकंड चान्स प्रोग्राम च्या पेण तालुक्यातील पहिल्या बॅचमध्ये ७१.८० टक्के मिळवत पेण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला वृषाली यांचा मुलगादेखील दहावीमध्ये याच वर्षी शिक्षण घेत होता. त्याचे नाव वंश लक्ष्मण म्हात्रे. याने यावर्षी दहावीमध्ये ६७ टक्के गुण मिळवले आहेत. शिक्षणासाठी स्वतःचा प्रवास पुन्हा सुरू करून मुलालाही शिक्षणात मार्गदर्शन करणे, ही एक आई म्हणून वृषाली यांची दुहेरी जबाबदारी होती, आणि त्यांनी ती अत्यंत जबाबदारीने पार पाडली. वृषाली यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, चिकाटी आणि प्रथम संस्थेच्या सेकंड चान्स प्रोग्रामचा मोठा वाटा आहे.