पाली-भूतीवली धरणात बुडून दोघांचा मृत्यू , महिनाभरातील दुसरी घटना

19 May 2025 13:04:05
KARJT
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात बुडून दोन पर्यटक तरुणांचा मृत्यू झाला. मुंबई गोवंडी येथील हे तरुण रविवारी (१८ मे) सकाळी धरणात आंघोळीसाठी उतरले असताना ही घटना घडली. स्थानिक आदिवासी तरुणांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, धरण परिसरात प्रवेशबंदी असतना, पर्यटक याठिकाणी येत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 
कर्जत तालुक्यातील रेल्वे परिसरामधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाली गावाचे स्थलांतरण करुन या लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. या धरण परिसरात मुंबईतील गोवंडी शिवाजीनगरमधील म्हाडा कॉलनी येथे राहणारे हिटवेष खांडू, इब्राहिम खान आणि खालिद शेख हे तीन तरुण टुरिस्ट टॅक्सी घेऊन रविवारी पहाटे साडेचार वाजता डिकसळ येथे आले. त्यांनी आपली गाडी धरण रस्त्याला गाडी उभी केली आणि तिघेही धरणावर गेले.
 
तेथे मौजमजा केल्यानंतर उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन धरणात आंघोळीसाठी उतरले. मात्र धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने खालिद शेख आणि इब्राहिम खान हे दोघे धरणात बुडाले.साडेसात वाजता डिकसळ येथील पोलीस पाटील राऊत यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाण्याला कळवले. सोबत दोरखंड, स्थानिक आदिवासी तरुणांना घेऊन पोलीस घटनास्थळी पोहचले.
 
KARJT
 
स्थानिक आदिवासी तरुण किरण गावंडा, हरी पिरकर, गोविंद पिरकर, रमेश पारधी यांनी पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह साधारण २० फूट खोल पाण्यातून बाहेर काढले. नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भास्कर गच्चे यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
 
२००४ मध्ये धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंत १०० हुन अधिक लोकांचे बळी गेले आहेत. धरण परिसरात प्रवेशबंदी असताना पर्यटक येतात आणि त्यांना धरणाची माहिती नसल्याने बुडून मृत्यू होताच. त्यामुळे सुरक्षेबाबत पाटबंधारे विभाग आणि पोलिसांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी टेन्ट उभारून धरण परिसरात राहण्यावर बंदी घालावी, बेणेकरून अशा दुर्घटना होणार नाहीत.- सचिन गायकवाड, प्रकल्पग्रस्त शेतकरी 
Powered By Sangraha 9.0