रायगड जिल्ह्यावर दोघांचा दावा! स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा

19 May 2025 12:23:10
alibag
 
अलिबाग | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. रविवारी (१८ मे) रायगडात दोन प्रमुख पक्षांचे मेळावे झाले. महाड येथे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार तर पेझारी येथे शेकाप नेते जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्याचे आवाहन करतानाच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या .निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे महाड येथे राष्ट्रवादीचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
यावेळी महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रांताध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना अजित पवार यांनी, पक्षात नवीनजुने पाहिले जाणार नाही. जो चांगले काम करेल, ज्यांच्यात नेतृत्व गुण आहे, त्यांना संधी दिली जाईल, असे सांगितले. नव्याने पक्षात आलेल्यांवर जबाबदारी दिली जाईल.
 
आपल्याला रायगड जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे. उद्याच्याला जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत यांच्या नवडणूका लागणार आहेत, याची आवठणदेखील त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना करुन दिली. आज मिळेल, उद्या मिळेल म्हणून गेली तीन वर्षे कार्यकर्ते थांबलेत. २२ फेब्रुवारीला नवीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन उमेदवार निवडून येणार होते. आज २०२५ आहे.
 
alibag
 
आता सुप्रीम कोर्टाने निवडणूका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पक्षाला बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दुसरीकडे शेकापनेही आपल्या पक्षांतर्गत विविध पदाधिकार्‍यांनी निवड जाहीर केली आहे. पक्षाचा नवीन शिलेदार निवडल्यानंतर त्यांना पक्षवाढीसाठी काम करण्याचे आवाहन पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. तर नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांनी शेकापला जिल्ह्यात नंबर १ वर नेण्याचा संकल्प केला आहे. शेकापला दोन महिन्यांत दोन मोठे झटके बसले आहेत. ज्यांच्या घरात शेकापक्ष वाढला त्या माजी आमदार पंडित पाटील, आस्वाद पाटील यांनी साथ सोडली तर पनवेलमधील जुने नेते जे.एम. म्हात्रे आणि त्यांचे पुत्र प्रितम म्हात्रे यांनी शेकापला अखेरचा ‘लाल सलाम’ केला आहे.
 
या पार्श्वभूमीवर पोलादपूर येथे होणारा शेकापचा मेळावा पेझारी नाक्यावर घेण्यात आला. त्यामुळे नुकतेच भाजपवासी झालेल्या शेकाप नेत्यांवर चार शब्द ऐकायला मिळतील, अशी चर्चा होती. मात्र सर्वांचाच हिरमोड झाला. गेलेत त्यांची चर्चा कशाला? म्हणत आहेत त्यांना सोबत घेऊन शेकापक्ष जिल्ह्यात नंबर १ वर नेऊया, असा नारा शेकापच्या नेत्यांनी यावेळी दिला. पक्ष सोडून गेलेल्यांचा विचार करु नका.
 
१९६२ साली पक्षातील मोठमोठे नेते पक्ष सोडून गेले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शेकापचा खासदार निवडून आला होता आणि आमदारही निवडून आल्याची आठवण शेकाप नेते जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली. चार महिन्यांत स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविण्याचा निर्धार करण्यात आला.
 
 
Powered By Sangraha 9.0